Friday 22 April 2011

असामान्य साहस

सहावा मुघल बादशहा औरंगजेब (१६५९-१७०७) हा एक कपटी राजा होता. आपले इप्सित साध्य करण्यासाठी तो जवळच्या संस्थानांच्या राजामहाराजांशी मैत्रीचे खोटे नाटक करीत असे. राजस्थान मधील जोधपूर संस्थानावर औरंगजेबचा डोळा होता, पण जोधपूरचा महाराजा यशवंतसिंग हा त्याला सवाई होता.

महाराजा यशवंतसिंग व युवराज पृथ्वीसिंग यांनी बादशहाच्या निमंत्रणावरून आगर्‍याला भेट दिली. औरंगजेबाने त्यांना शाही उद्यानांत नेले आणि राज बागेतील वैभव दाखवले. महाराजा यशवंतसिंगांनी त्या सौंदर्याचे कौतुक केले, शेवटी औरंगजेबाने उद्यानाच्या टोकाला असलेल्या एका मोठ्या पिंजर्‍याकडे त्यांचे लक्ष वेधले, तेव्हां या पाहुण्यांनी त्यांत विशेष स्वारस्य दाखवले नाही. बादशाहाला आश्‍चर्य वाटले, कारण त्या पिंजर्‍यात  त्याचा सर्वांत आवडता असा एक धिप्पाड, उग्र मुद्रेचा भयंकर वाघ होता.

बादशाहाने अभिमानाने विचारले ‘‘महाराज, असे उमदे जनावर तुम्ही कधी बघितले होते कां? याची डरकळि देखील मोठ मोठ्या विरांना घाबरवून सोडते.’’

यशवंतसिंगाने वाघाकडे एकवार बघून म्हटले, ‘‘कोणत्या शूरवीरांबद्दल आपण बोलत आहात, जहांपन्हां? माझ्या राज्यांत लहान मुले देखील असल्या जनावरांबरोबर खेळतात.’’

‘‘हो कां?’’ औरंगजेब रागाने म्हटला.
‘‘आपला विश्‍वास नाही कीं काय?’’ महाराजाने गंभीर स्वरांत विचारले.

बादशाहा तोर्‍यांत म्हणाला,"अशक्य! या वाघाच्या शेपटीला हात लावण्याचे साहससुधा तुमच्या संस्थानातील कुणीही करू शकणार नाही आणि तसे करणारा क्षणभरही जिवंत राहणार नाही!’’

‘‘आपल्याला शंका आहे तर!’’ असे म्हणून महाराजानी आपल्या तरुण मुलाकडे बघितलं.

युवराज पृथ्वीसिंगाला पित्याचा हेतू समजला. त्याने तडक पिंजर्‍याचे दार उघडले आणि तो आंत घुसला. चिडलेला वाघ त्याच्यावर चालून आला. युवराजाने वाघाच्या तोंडावर एक ठोसा मारला आणि वाघ भेलकांडत खाली पडला. युवराज आणि वाघामधील लढाई  औरंगजेब विस्फारलेल्या डोळ्यांनी, अविश्वासने हा प्रसंग बघत होता. शेवटी वाघ खाली मरुन पडला आहे याची खात्री करुनच जखमी झालेला युवराज रक्ताळलेल्या अंगाने पिंजर्‍याबाहेर पडला.

थक्क झालेल्या औरंगजेबाने लाजिरवाण्या मुद्रेने युवराजाचे कौतुक केले. त्याची ताकद, धैर्य, कौशल्य, याबरोबरच वडिलांच्या शब्दाला मान देण्याबद्दल बादशहाने प्रशंसा केली. महाराजाने औषधोपचारासाठी मुलाला आपल्या तळावर नेले. युवराज लौकरच बरा झाला.

पण औरंगजेबाला हा अपमान जिव्हारी लागला होता. काही काळानंतर त्याने पराक्रमी पृथ्वीसिंगाला कपटाने ठार मारले.
सौजन्य: www.kavadsa.co.cc

0 comments:

Post a Comment