Friday 22 April 2011

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दीप ज्ञानाचा

अकोले तालुक्यातील ज्ञानदीप प्रतिष्ठानने नुकतेच 'गुणवत्तापूर्ण शिक्षण' या विषयावरील दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. वैशाखातला उष्मा, लग्नसराई, जनगणनेच्या कामाचा ताण आणि उन्हाळी सुट्टीतही सुमारे ३५ ते ४० शिक्षक या दोन दिवसांच्या कार्यशाळा जातीने हजर होते. केवळ उपस्थित न राहता त्यांनी कार्यशाळेत कृतीशील सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे आयोजन, नियोजन, संयोजन सर्व शिक्षकांचेच. हि कार्यशाळा म्हणजे एका अर्थाने स्वत:ला समृद्ध करण्यासाठी शिक्षकांची धडपड होती, असेच म्हणावे लागेल.
ज्ञानदीप प्रतिष्ठान ही तालुक्यातील धडपडणाऱ्या मुख्यत: प्राथमिक शिक्षकांनी अलीकडेच स्थापन केलेली संस्था या संस्थेने भारत ज्ञानविज्ञान समुदाय दादासाहेब रुपवते फौंडेशन यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. शिक्षकांनी स्वत: पुढाकार घेत अशा प्रकारचा विधायक उपक्रम आयोजित केल्याचे हे उदाहरण तसे दुर्मिळच. सरकारी प्रशिक्षणाबाबत शिक्षकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच शिक्षक अशा प्रशिक्षणात नाविलाज म्हणून सहभागी होतात. अनेकदा प्रशिक्षण वर्ग कांटाळवाणे
असतात. त्यामुळेच शिक्षकांच्या टीकेचा विषय बनली आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेतील शिक्षकांचं सक्रिय सहभाग निश्चितच दिलासा देणारा होता. भले त्यांची कमी असेल पण शिक्षक स्वत:हून धडपडू लागेल नवीन वाटा धुंडाळू लागले हे चित्र आश्वासक आहे या गोष्टीचे निश्चितच स्वागत करायला हवे एरवी सरकारी प्रशिक्षणाला दांड्या मारणारे या कार्यशाळेत पूर्णवेळ उपस्थित होते शाळा सुरु असताना पाच वाजले कि ज्यांना घरी जायची ओढ लागते असे शिक्षक सात वाजेपर्यंत कार्यशाळेतील कार्यक्रमांना उपस्थित राहत होते तेही कोणत्याही स्वरूपाचे भत्ते नसताना. शिक्षकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाची करणे वेगवेगळी असावीत काहींना शिक्षकांची मलीन झालेली प्रतिमा खुपते असेल स्वत:ची एक वेगळी ओळख तर काहींना गुणवत्तेची आत
आंतरिक ओढ लागली असेल. कारण काही असले तरी आपण करू आपला उधार ही त्याची भूमिका निश्चितच आशादायक आहे. शिक्षकांनी उपक्रमशीलता वाढविणे हा या कार्याशाळेमागचा मुख्य उद्देश. शैक्षणिक गुणवत्तेचा आग्रह सर्वचजण धरतात पण गुणवत्ता नेमके कशाला म्हणायचे? परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीला का नेतृत्वाच्या जडणघडणीला. या बाबतीत संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षक  भांबावलेला आहे. या बाबत शिक्षकाला निश्चितच दिशा व दृष्टी मिळावी, हाही कार्यशाळेचा दुसरा हेतू. शिक्षण
क्षेत्रातील कार्यकर्ते किशोर दरक यांनी गुणवत्तेचे विविध पैलू उलगडून दाखविताना शिक्षकांना नवीन दृष्टीकोन निदर्शनास आणून दिला. सरकारदरबारी गुणवत्ता आकडेवारीत अडकली असल्याचे त्यांनी सांगितले भारतासारखा विषमता आणि शोषण असणाऱ्या देशात जे शिक्षण शोषणाची जाणीव करून देत नाही त्याविरुद्ध लढायला प्रवृत्त करत नाही ते शिक्षण गुणवत्तापूर्ण कसे असा त्यांचा रोकडा सवाल बरेच काही सांगून गेला प्रा. माधुरी दीक्षित यांनी लिंग समभाव या विषयाची मांडणी सहजशैलीत केली त्यांनी दिलेले अभ्यासक्रमातील दाखले, दैनंदिन जीवनातील उदाहरणे उपस्थितांना अंतर्मुख करून गेली. शिक्षकांच्या प्रशिक्षणात स्त्री- पुरुष समानता हा विषय अनेकदा असतो पण अशा प्रकारे या विषयाची मांडणी कोणत्याच प्रशिक्षणात शिक्षकांना ऐकायला मिळाली नव्हती. परिसर भेट हा अभ्यासक्रमांचा अविभाज्य भाग झाला आहे मात्र त्याबाबत नक्की काय बरेचसे शिक्षक अनभिज्ञ आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुनील पोते या सामाजिक कार्यकर्त्यांचे नदीचा उगम, गावाचा इतिहास आदी शिक्षणपूरक उपक्रमांचे अनुभव प्रेरक होते. शोभना पांडे यांनी मार्गदर्शन केले तर मुंबई विद्यापीठातील लिंग्वीस्टिक विभागप्रमुख अविनाश पांडे यांनी कला व शिक्षणाबाबतची तात्विक बाजू प्रभावीपणे मांडली. प्रशांतबाबू या कर्नाटकातील कार्यकर्त्याने आनंददायी शिक्षण कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या दोन- अडीच तास चाललेल्या सत्रात शिक्षक मुलासारखे समरस होऊन गेले. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या प्रसाद मेहंदळे यांनी कृतीशील विज्ञान शिक्षण कसे असावे हे सप्रयोग दाखविले. नाशिकच्या आनंदनिकेतन या प्रयोगशील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांचे समारोपाचे भाषण म्हणजे या कार्यशाळेचा  परमोच्चबिंदू होता. प्रचलित शिक्षणव्यवस्थेची भेदक शब्दांत चिरफाड करताना त्यांनी वास्तवाचे भान आणून दिले, तर दुसरीकडे शिक्षणात
उपक्रमशीलता कशी आणावी याचे अनुभवजन्य असे प्रेरक मार्गदर्शन केले. त्यांचे भाषण शिक्षकांना आत्मभान आणून देणारे होते. शिक्षणतज्ञ, अधिकारी, समाज, सरकार या सर्वांच्याच आज शिक्षकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक धडपडणाऱ्या
शिक्षकांनाही काहीतरी करावयाचे आहे. पण त्यांनी नक्की काय करायला पाहिजे, याचे सुस्पष्ट मार्गदर्शन कोणीच करीत नाही डी.एड., बी.एड., महाविद्यालये याबाबत काहीच देत नाहीत. अनेक शिक्षकांत ऊर्जा आहे. काही करण्याची उमेद आहे. मात्र,
त्यांना घडवायचे असेल तर पैलूच पाडावे लागतील. त्यादृष्टीने शिक्षकांनीच पुढाकार घेऊन सुरु केलेले असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतील. अकोले महाविद्यालयाचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले. दादासाहेब रुपवते फौंडेशनने मोठा
भार उचलला. तसेच फौंडेशनच्या उत्कर्षा रुपवते या दोन्ही दिवस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत उपस्थित उपस्थित होत्या.ज्ञानदीप प्रतीष्ठानचा हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.

- प्रकाश टाकळकर (प्राचार्य, सर्वोदय विद्या मंदिर राजूर)

0 comments:

Post a Comment