Friday, 22 April 2011

तामकड्याची सहल

           पर्यावरणाबाबत मुलांमध्ये सजगता निर्माण व्हावी यासाठी इ. १ ली पासूनच परिसर अभ्यास हा विषय प्राथमिक शिक्षणात समाविष्ठ करण्यात आला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाबाबत मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्ग हे उघडे पुस्तक असल्याचे सांगितले आहे. हे उघडे पुस्तक विद्यार्थ्यांनी वाचावे. हिरवाईने नटलेल्या निसर्गाशी आपले नेमके नाते काय आहे, हे जाणून घ्यावे या हेतूने तामकड्याच्या धबधब्याकडे जाण्याचे ठरले. मुलांना तसे सांगितले तेव्हा ती आनंदाने उड्याच मारू लागली. 
           मात्र वनभोजनापुरता उद्देश मर्यादित नव्हताच. पर्यावरणाच ढासळत चाललेलं संतुलन सावरणं. वाटेतून जाता - येता विद्यार्थ्यांनी पिके, शेतात राबणारे शेतकरी सिंचनाच्या आधुनिक सोयी व परिसराचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करावे, हाही हेतू होताच. ठरल्याप्रमाणे मुले मोठ्या उत्सुकतेने जमली होती. शाळेपासून दिडेक मीटरचे अंतर बघता बघता संपले. बहिरवाडीच्या शिवारातून जाताना फुलवाऱ्यात आलेली वाऱ्यावर डोलणारी  बाजरीची शेत, मन वेधून घेणारी झेंडूची लाल पिवळी फुलं, जवळचे हिरवा शालू परिधान केलेले डोंगर हा सारा निसर्गरम्य परिसर जवळून पाहण्याचा योग आज जुळून आला होता. 
           तामकड्याच्या जंगलतल्या पूर्वेकडील पायवाटेने तांडा चालू लागला. मोराचा केकारव, पक्षांची किलबिल सुरु होती . निर्झर खळखळ गाणे गात जणू स्वागताला सज्या होते. दाट झाडीतल्या एका पायवाटेने मुलांची दिंडी जात होती. प्रसंगी शिक्षकांशी चर्चा करत होते. प्रश्न विचारत होते. निसर्ग आणि यांचे अतूट नाते आहे, याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत होता. दाट झाडीच्या जंगलातून जाणाऱ्या या वाटेने सोबतीला असलेले गावकरी  वाघाच्या राहण्याच्या गुहा, वानरटोक, चोरनळी, भीतीचा मोख, माची अशा भूरचना दाखवत होते. कुतूहलमिश्रीत नजरेने मुले हे सारं ऐश्वर्य पाहताना स्वतःला निसर्गात हरवून बसली होती.यातील काही भित्री मुले पुढे पुढे धिटाईने सारे काही न्याहाळत होती. माऊलाईच्या धबधब्या जवळ  पोहोचल्यानंतर तर मुलांच्या मनाला अक्षरशः उधान आले होते. धबधब्याजवळ उभे राहून फोटो घेता घेता सारेजण या जलप्रपाताच्या परमात पडले. मुले पाण्याशी लगट करू लागले. पाण्याची, जंगलाची, काडेकापारीची  अनामिक भीती त्यांच्या मनातून कुठल्या कुठे पळून गेली होती. धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजताना निक्स्र्गाचे अनोखे संगीत ऐकताना सारे निसर्ग तत्वाशी एकरूप होऊन गेले. सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी अंगावरील कपड्यांनिशी गाढ आलिंगन दिले. विद्यार्थी - शिक्षक नात काही काळासाठी सारेच विसरले होते. 'मैत्री'  धाब्धब्याशी अन नात निसर्गाशी ! असेच एकूण चित्र दिसत होते. तेथेच दुपारचे जेवण सर्वांनी मिळेल त्या जागी बसून घेतले. पाखरांच्या किलबिलाताटात मुलांची किलबिल एकरूप झाली होती. कोण कोलांट्या उड्या मारी, तर कोण झाडावर चढत होता. कोणी झाडाच्या फांद्यांचा झोपाळा केला होता. काही मुलांनी सागाच्या पानाच्या छानदार टोप्या बनविल्या होत्या. तीन बाजूनी डोंगररांगानी वेढलेल्या परिसरात मुले आता चांगलीच विसावली होती. काही मुलांनी सोबत आणलेल्या सीताफळ, सुबाभूळ, जांभूळ, बोर यांच्या बिया येथे लावल्या. वानविभागाचे अधिकारी श्री. दामू चासकर यांनी मुलांशी मनमोकळ्या गप्पा करत प्राणी, पक्षी आणि परिसराची ओळख करून दिली.यावेळी त्यांनी पक्षांची नावे विचारल्यानंतर वर्गात शांत वाटणारा किरण पथवे या विद्यार्थ्याने एकदम दहा पक्ष्यांची नावे सांगितली व सध्या सुगरणीचा विणीचा हंगाम सुरु आहे अशी जास्तीची माहितीही त्याने दिली. दुसरा एक आदिवासी ठाकर समाजातील वैभव पथवे या विद्यार्थ्याने डझनभर औषधी वनस्पतींची नावे सांगितली. याखेरीज त्या वनस्पतींची माहिती आणि विशेष म्हणजे औषधी गुणधर्मही त्याने सांगितले. बिनभिंतीच्या शाळेत विद्यार्थी अनेक गोष्टी शिकतात. त्याचे प्रकटीकरण यावेळी झाल्याचे पाहायला मिळाले. आता रिमझिम पावसाच्या सारी अंगावर घेत सर्व जणपरतीच्या प्रवासाला लागले. दिवसभर वेगळ्याच भावविश्वात  रममाण झालेल्या मुलांची पावले माघारी फिरताना जडावली होती. बहुतेकजण मानाने तेथेच रेंगाळले होते...
 

0 comments:

Post a Comment